बारामतीत बुधवारपासून अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा; नागरिकांना पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन
बारामती : बारामती शहराच्या अनेक भागांमध्ये बुधवार, २८ मे २०२५ पासून पाणीटंचाईची झळ बसणार आहे. बारामती नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शारदा प्रांगण, कसबा आणि मार्केट यार्ड परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण नलिकेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे, पुढील आदेश येईपर्यंत या भागांतील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल.
कोणत्या भागांना बसणार फटका?
नगर परिषदेच्या घोषणेनुसार, कोष्टी गल्ली, श्रावण गल्ली, क्षत्रिय नगर, आमराई, विठ्ठल नगर, सुहास नगर, चंद्रमणी नगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्टँड परिसर, कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बळवंढोबा मंदिर पथ, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांदुळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली, नेवसे रोड, कसाब गल्ली, रामगल्ली आणि विजय नगर या प्रमुख भागांतील नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.
गुरुवारी ‘या’ भागांत पाणी मिळणार नाही!
दरम्यान, गुरुवार, २९ मे २०२५ रोजी कसबा टाकीवरील भागातील शिक्षक सोसायटी, साठे नगर, पंचशील नगर, सुधारणा नगर, शाळा क्रमांक २ परिसर, चांदणी चौक, श्रीराम नगर, सावतामाळी नगर, जगताप मळा, सटवाजी नगर आणि मुजावर वाडा या संपूर्ण ठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही, असेही नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांना गुरुवारच्या दिवशी पूर्णपणे पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे, जपून पाणी वापरावे
या तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल नगर परिषदेने दिलगिरी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे मुख्याधिकारी बारामती नगर परिषद यांनी कळवले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद यांनी केले आहे. पाणीटंचाईच्या या काळात नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे.


