बारामतीत लाच घेताना वनपालाला रंगेहात पकडले; ६ हजारांची लाच स्वीकारली


बारामतीत लाच घेताना वनपालाला रंगेहात पकडले; ६ हजारांची लाच स्वीकारली

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

बारामती | दि. २६ ऑक्टोबर २०२६

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील शेतजमिनीतील माती नदीत वाहून गेल्याच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तसेच काम सुरू ठेवण्यास मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. जहीर सिराज शेख (वय ४७, वनपाल, वर्ग-३), करंजे राऊंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, बारामती, असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ६०) यांची कोऱ्हाळे बुद्रुक येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. या शेतातील माती पावसामुळे नीरा नदीत वाहून गेली होती. नदीपात्रातील माती शेतात टाकत असताना वनपाल जहीर शेख यांनी २६ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदाराचे काम बंद करण्यास सांगितले होते. तसेच कारवाई न करता काम सुरू ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःसाठी आणि सहकारी भुमरे यांच्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.

Advertisemen

तडजोडीनंतर चार हजार रुपये स्वीकारण्यात आले होते, तर उर्वरित सहा हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी २३ ऑक्टोबर रोजी पडताळणी केली. यावेळी आरोपी वनपालाने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष सहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

त्यानंतर २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सापळा कारवाई करण्यात आली. बारामतीतील माळेगाव परिसरात हॉटेल शिवकृपा, आयटीआयसमोर, येथे आरोपीने तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने केली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी पर्यवेक्षण केले, तर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन : शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »