बारामतीत पेन्सिल चौकात दोन गटांत राडा; १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


बारामतीत पेन्सिल चौकात दोन गटांत राडा; १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांततेचा भंग; बारामती तालुका पोलिसांची तातडीने कारवाई

बारामती : बारामतीतील पेन्सिल चौक परिसरातील मॉलसमोर दोन गटांत झालेल्या भांडणाप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १९४ (२) अन्वये ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळ गावात सुशांत मोहिते आणि श्रेया आटोळे व प्रताप आटोळे यांच्यात वाद झाला होता. या वादासंदर्भात तक्रार देण्यासाठी संबंधित व्यक्ती बारामती तालुका पोलीस ठाण्यात येत असताना पेन्सिल चौकातील मॉलसमोर दोन्ही बाजूंचे समर्थक एकत्र आले. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊन मारामारी सुरू झाली.

पेन्सिल चौकात भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधितांना पोलीस ठाण्यात आणले.

Advertisemen

पोलिसांनी दोन्ही गटांना परस्परांविरुद्ध तक्रार देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तक्रार न दिल्याने सार्वजनिक ठिकाणी भांडण करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ अन्वये गणेश शरद आटोळे, विनोद विठ्ठल आटोळे, अनिकेत प्रमोद बेंगारे, विकास अशोक आटोळे, तुषार बंडू आटोळे, आदेश ज्योतीराम आटोळे, धनाजी संपत आटोळे, स्वप्निल शिवलाल आटोळे, अभिमान अंबुदास लांडगे, समाधान शशिकांत भिसे, सुशांत बाळू मोहिते, प्रितम अंकुश कुचेकर, मनोज सुहास बागाव, निखिल शिवलाल आटोळे, सोहम राजू लोंढे आणि आदित्य अतुल भिसे या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप काळे करीत असून, पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »