तडीपार गुन्हेगार निलेश उमरदंडवर बारामती शहर पोलिसांची कारवाई; ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात सोडले!
तडीपार गुन्हेगार निलेश उमरदंडवर बारामती शहर पोलिसांची कारवाई; ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात सोडले!
तडीपार असतानाही बारामतीत आढळल्याने गुन्हा दाखल; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
बारामती : पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार निलेश प्रदीप उमरदंड (वय २२, रा. कसबा, बारामती) हा बारामती शहरात आढळून आल्याने बारामती शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. त्याला ताब्यात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश उमरदंड याच्याविरुद्ध यापूर्वी एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वारंवारच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी मागील वर्षी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षकांमार्फत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविला होता.
या प्रस्तावानुसार, २१ नोव्हेंबर २०२५ पासून निलेश उमरदंड याला पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली होती.
दरम्यान, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती शहर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत निलेश उमरदंड हा तडीपार असतानाही बारामती शहरातील प्रगतीनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांनी स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी निलेश उमरदंड याला ताब्यात घेतले. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४२ अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३५/२०२६ दाखल करण्यात आला. त्यानंतर कायदेशीर कारवाई करून त्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोडण्यात आले.
गोपनीय माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्याचे आवाहन
तडीपार गुन्हेगार शहरात आढळल्यास किंवा अशा प्रकारच्या गुन्हेगारी हालचालींची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्या बातमीदारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत बारामती शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे, पोलीस उपनिरीक्षक संजय पुजारी, पोलीस शिपाई सागर जमादार, चालक ऋषिकेश जाधव आणि आरटीपीसी अक्षय कोळेकर यांनी सहभाग घेतला.


