बारामतीत वाहतुकीसाठी ‘सिग्नल’ व्यवस्था; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
बारामती, दि. १०: शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी बारामती शहरातील १० प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बसवण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करण्याचे आणि चौकांना योग्य ती नावे देण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक, ध्वजस्तंभ परिसर, गुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जलसंपदा विभागाच्या कर्मचारी निवासस्थानांच्या सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
शहराच्या सौंदर्यीकरणावर भर
यावेळी बोलताना पवार यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले, नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात उभारण्यात येत असलेल्या ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. नगर परिषद कार्यालयाजवळील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारताना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांचा त्यात समावेश करावा आणि परिसरात योग्य विद्युत रोषणाईची व्यवस्था करावी.
गुणवडी चौकातील व्यापारी संकुलातील फरश्या, रंगरंगोटी आणि रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त निवासस्थाने बांधण्यास सांगितले. सेंट्रल पार्कसमोर महापुरुषांचे पुतळे बसवण्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बारामती बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवून अधिक सावली देणारी झाडे लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे
अजित पवार यांनी सुरू असलेल्या सर्व विकासकामांचे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि टिकाऊ काम करण्याचे निर्देश दिले. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनीही वाहतूक सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, तसेच इतर अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.