जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती नगरीत प्रशासनाच्यावतीने उत्साहात स्वागत


बारामती दि. ६ :  जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती शहरामध्ये ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम..ज्ञानोबा माऊली तुकाराम… च्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्यावतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगरपरिषेदेकडून वारकऱ्यांसाठी सुविधा आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  बारामती नगरपरिषदेने पूर्वतयारी केली आहे.  शारदा प्रांगण व नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. निर्मल वारीअंतर्गत शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे.

‘निर्मल वारी हरित वारी’ च्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी व पर्यावरण हरित संतुलनासाठी जनजागृतीविषयक उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरात कचरा कुंडी, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अशी व्यवस्था करण्यात आली असून ध्वनीक्षेपकाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

Advertisemen

बारामती शहरात चौकाचौकात विविध संस्था संघटना यांच्याकडून पालखी रथाचे व दिंड्याचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. काही सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपहार, फळे, पाणी पुरवठा व इतर सेवा पुरवण्यात येत आहेत.

या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, कौशल्य व उद्योजकता विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, वन विभाग आदी विभागांच्या चित्ररथातून शासनाच्या योजनांविषयी जनजागृती करण्यात येत असून या चित्ररथास वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बारामती नगर परिषद येथे आयोजित प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रमाचे बारामती नगर परिषद येथे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत ३० पॅनल असलेले प्रदर्शन, एलईडी व्हॅन व त्यावर नाट्यपथक, आकर्षक चित्ररथ, पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मंगळवारी हे प्रदर्शन आंथुर्णे, ता. इंदापूर येथे असणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देवून विविध विकासाच्या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »