बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला; पोलिसांच्या सतर्क व शौर्यामुळे अनर्थ टाळला आरोपीला तात्काळ अटक
बारामती (दि. १ ऑगस्ट): बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका बसमध्ये एका प्रवाशावर लोखंडी कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला तात्काळ अटक केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात पवन अनिल गायकवाड (वय २९) हे गंभीर जखमी झाले आहेत.
Advertisemen
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन गायकवाड हे बारामती-इंदापूर बसने प्रवास करत असताना काटेवाडी येथे बस पोहोचली. त्यावेळी, त्यांच्या मागच्या सीटवर बसलेल्या अविनाश शिवाजी सगर (वय २१) या तरुणाने अचानकपणे कोणताही वाद नसताना, आपल्या हातातील कोयत्याने पवन गायकवाड यांच्यावर वार केले.
या हल्ल्यात पवन गायकवाड यांच्या गळ्याला, कानावर, खांद्यावर आणि डाव्या हाताच्या कोपरावर गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी अविनाश सगर याला अटक केली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. आरोपीची प्राथमिक चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला पुढील उपचारासाठी मनोरुग्णालयात पाठवले आहे.
पवन गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार, बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये अविनाश सगर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अधिकारी अमोल कदम करत आहेत. आरोपी अविनाश सगर हा मूळचा लातूरचा असून, सध्या तो सोनगाव, ता. बारामती येथे वास्तव्यास आहे.