मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा: ड्रग्ज प्रकरणात पुन्हा गुन्हा केल्यास ‘मकोका’खाली कारवाई!
गुटखा, गांजा किंवा तत्सम पदार्थांची तस्करी झाल्यास कठोर कारवाई केली जाईल!
मुंबई: अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत माहिती दिली की, नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्यांतर्गत अटक केलेला आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा करत असल्यास, त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई केली जाईल. यासंबंधीची तरतूद याच अधिवेशनात केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके आणि एकनाथ खडसे यांनी ड्रग्ज तस्करीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुधारित अमली पदार्थविरोधी धोरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट (NDPS Unit) स्थापन करण्यात आले आहे आणि जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही कार्यरत आहेत.
गेल्या अडीच वर्षांत अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून, केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाला आहे. राज्यांदरम्यान इंटेलिजन्स शेअरिंग (गुप्तचर माहितीची देवाणघेवाण) सुरू झाल्याने तस्करांविरुद्ध एकत्रित कारवाई करणे शक्य झाले आहे.
याव्यतिरिक्त, सरकारने व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या आणि दर्जा वाढवण्याचे धोरण स्वीकारले असून, दर्जेदार केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गांजाच्या शेतीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मध्य प्रदेशसह इतर कोणत्याही राज्यात गांजाची शेती कायदेशीर नाही. गुटखा, गांजा किंवा तत्सम पदार्थांची तस्करी झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.