बारामतीमध्ये लाचखोरी उघडकीस, नगररचनाकाराला अटक; बिल्डर ला मागितली बॉडी बिल्डरने लाच


बारामती (प्रतिनिधी): बारामती नगरपरिषदेतील नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदार भगवान संभाजी चौधर यांच्या तक्रारीनुसार, ढेकळे यांनी त्यांच्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.
चौधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा ‘निर्मिती असोसिएट्स’ नावाचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी बारामती परिसरात निवासी व वाणिज्य प्रकल्प सुरु करण्यासाठी नगरपरिषदेकडे प्रस्ताव सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी नगररचनाकार विकास ढेकळे यांनी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम एक लाख 75 हजार रुपयांवर निश्चित झाली.

Advertisemen


या घटनेनंतर, चौधर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पडताळणी केली असता, ढेकळे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, पोलिसांनी सापळा रचून ढेकळे यांना रंगेहाथ पकडण्याचे नियोजन केले.
दिनांक १९/०३/२०२५ रोजी, पोलिसांनी चौधर यांच्यामार्फत ढेकळे यांना लाचेचा पहिला हप्ता देण्याचे ठरवले. त्यानुसार, चौधर यांनी सायंकाळी ०७:४५ वाजता ऑक्सीजन फिटनेस क्लब, बारामती येथे विकास ढेकळे यांना एक लाख रुपयांची लाच दिली. लाच स्वीकारताच पोलिसांनी ढेकळे यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत, ढेकळे यांच्या हाताला अँथ्रासीन पावडर लागल्याचे आढळून आले, जे नोटांना लावले होते. या घटनेनंतर ढेकळे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन रतन चेके करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »