बारामतीत आरोग्यसेवेचा सुवर्णकाळ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रम यशस्वी
30 बालकांना मिळाला जीवनदायी आधार, बारामतीत रुग्णसेवेचा नवा इतिहास
बारामती, : आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या बालकांसाठी बारामतीत एक दिलासादायक उपक्रम सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांच्या दूरदृष्टीतून गरजूंसाठी मोफत शस्त्रक्रिया उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
बारामतीतील मुथा हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ञ डॉ. राजेंद्र मुथा आणि डॉ. सौरभ मुथा यांच्या सहकार्याने मुंबईतील प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. संजय ओक आणि त्यांच्या टीमने या उपक्रमात सेवाभावी योगदान दिले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत ३० हून अधिक बालकांवर हर्निया, टाळूला जोडलेली जीभ दुरुस्त करणे आणि गाठी काढणे यांसारख्या विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.
Advertisemen
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, अनिल नवरंगे, अनिल जोगळेकर, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, प्रियांका मुथा, डॉ. अनिल मोकाशी, अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी नितीन हाटे, किरण तावरे आणि प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे उपस्थित होते.
मोफत शस्त्रक्रिया उपक्रम नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्धार:
“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम बारामतीत नियमितपणे राबवण्याचा आमचा मानस आहे. यामुळे गरजू बालकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा विनामूल्य उपलब्ध होईल,” असे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
उपचारांची नवी सुरुवात:
या स्तुत्य उपक्रमामुळे बारामतीतील गरजू कुटुंबांना आरोग्यसेवेची नवी संधी मिळाली आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या बालकांसाठी हा उपक्रम एक वरदान ठरला आहे.