काही राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्त एखाद्या समाजाबद्दल ,एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे- वादग्रस्त वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातींना आणि बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तोच विचार हा आपल्याला पुढे तारून नेणार आहे. काही राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्त एखाद्या समाजाबद्दल ,एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या धर्माबद्दल एवढं वाईट बोलतात आमचा त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. हे होता कामा नये- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र पाहायला मिळत आहेत. एकीकडे विरोधक सातत्यानं सत्ताधाऱ्यांना फैलावर घेत आहेत. तर, दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना सडेतोड उत्तरं देत आहेत. पण, अशातच भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांकडून टीकेची तोफ डागली जात आहे. मात्र, सत्ताधारी महायुतीची पुरती गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार विरोधकांसोबतच महायुतीतील नेत्यांनी देखील घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. फक्त हिंदूंसोबतच व्यवहार करा, सर्वधर्मसमभाव मानू नका, असं नितेश राणे म्हणाले आहेत. मुस्लिमांसोबत व्यवहार करु नका, असं सांगताना त्यांनी खालच्या भाषेत टीका केली आहे. दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी संताप व्यक्त केला आहे. एखाद्या समाजघटकाविरोधातली वक्तव्य खपवून घेणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनंही नितेश राणे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नितेश राणेंना खतपाणी घालून जातीय तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र भाजपनं केल्याचं ठाकरेंच्या शिवनसेनेचे नेते शरद कोळी म्हणाले आहेत.