राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
पुणे, दि. २३: विशेष संक्षिप्त पूनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असून या वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीने निवडणूक यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीस उप जिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, मतदान पूनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्याने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देवून दखल घेतली आहे. यावर्षीही राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 हजाराहून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यातील ६२ टक्के मतदान केंद्र शहरी भागात आहेत. राज्याचा मतदानाचा विचार केला तर १० टक्के मतदार पुणे जिल्ह्यात आहेत.
मतदार यादीचे शुद्धीकरण वर्षभर सूरूच राहणार आहे. मतदार यादीच्या शुद्धीकरणाने मतदान प्रक्रीया अधिक पारदर्शक होण्यास मदत होईल. या प्रक्रियेत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करावी, असे आवाहन त्यांनी केले.