भाकड जनावरं मरण यातना भोगताना
महाराष्ट्रात गोवंश व गोमाता संरक्षण कायदा निर्माण झाला व महाराष्ट्रात जणू दिवाळीत साजरी करण्यात आली. गुलाल उधळत गावोगावी गोवंश व गोमाता ची मिरवणूक काढण्यात आली सर्वधर्मंच्या लोकांनी सरकारच्या या निर्णयाचा सर्वधर्म गावकऱ्यांनी मनापासून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गावरान गाईचं दूधदुप्त लेकरा बाळांना मिळेल या भाबड्या आशेने शेतकरी माता प्रफुल्लित झाली.
पण निसर्गाच्या मनात वेगळंच होतं निसर्गाची साखळी निसर्गाची कडी तोडून विकृत अनैसर्गिक भावनेने पेटलेल्या भावना वेड्या लोकांनी हा कायदा एक शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात केली. सरकारने केलेल्या कायद्यामध्ये गोमाता व गोवंशाला वाहतुकीची पूर्ण परवानगी असताना तीसमार खान अवलादी गावोगावी गल्लोगल्ली हातात तलवाऱ्या काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले व गोरगरीब शेतकऱ्यांच्या गोवंश व गोमाता यांच्यावर दरोडे घालून रस्तोरस्ती लूट चालू केली. नियमबाह्य बेकायदेशीर ही दरोडेखोरी थांबवण्यास सरकार अपयशी ठरली आहे व गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागला. हे कमी होतं म्हणून की काय अखंड महाराष्ट्रात या कायद्याच्या नियमबाह्य वापरामुळे जनावरांची व्यापार व वाहतूक करणे बंद झाले ही समस्या फक्त कुरेशी समाजाची नसून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची शेतावर कष्ट करणाऱ्या मजुरांची व जनावरांच्या रीतसर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची होती पण द्वेष भावनेतून जनावरांचे हाल करण्याची प्रक्रिया सुरू झाली व यालाच कट्टरता वाद म्हणून मिरवू लागले.
भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये जनावरांचे बुचडखाने कोणाचे आहेत भारतातून या मटन व्यवसायाचा आंतरराष्ट्रीय व्यापार कोण करत आहे हे सहज आपल्या हातातील मोबाईल मधून गुगलने शोधता येते हा विषय वेगळा आहे यात आम्हाला पडायचं नाही. गेले दोन वर्ष झाले जनावरांच्या बाजारात 80 टक्के ने कमी झाले आहे भाकड जनावर गावोगावी मोकळी फिरू लागली आहेत. अपघाताने व ना ना तऱ्हेच्या रोगाने मृत्युमुखी पडत आहेत. अशा अवस्थेत गोशाला नामक एक व्यापार चालू झाला आहे गोशालेतील दान दिलेल्या ओढून आणलेल्या पोलिसांनी ताब्यात दिलेल्या नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका यांनी ताब्यात दिलेल्या गोवंश व गोमाता अचानक गायब होऊन नोंदवहया सापडनस्या झाल्या आहेत. या गोशाळेचं पितळ उघडं पडल्यानंतर अनेक दानशूर व्यक्तींनी या धंद्यावाईक प्रवृत्तींना खतपाणी घालणं बंद केले आहे व ढोंगींचे ढोंग उघडे पडले
या महाराष्ट्रामध्ये अनेक पांजरपोळ गोशाळा आदर्श पद्धतीने चालवल्या जात आहेत. अशा गोशाळेतून पर्यावरण पूरक गृहउपयोगी आरोग्य उपयोगी वस्तूंची निर्मिती केली जात आहे हे अभिमानास्पद कार्य आहे. परंतु महत्त्वाचा नैसर्गिक साखळी जी या पृथ्वीच्या निर्मितीपासून चालू आहे ती खंडित करणे यास कोणता धर्म म्हणायचा प्राचीन यज्ञ संस्कृती वेद संस्कृती हवन होम हवन पशुपक्षी बली देण्याची प्रथा आजही प्राचीन ग्रंथांमध्ये वेदांमध्ये आपली साक्ष देत आहे. आम्हाला पुराणात जायचं नाही. प्राचीन कालखंड आम्हाला सांगायचा नाही. पण या भाकड गोमाता व गोवंशाच्या जबाबदारी कोण घेणार हा आमचा मूलभूत प्रश्न आहे. सरकारने कायदा बनवताना जबाबदारी हा शब्द कायद्यातून वगळलेला आहे. भाकड जनावर विकून गुप्त किंवा गाभण जनावर घ्यायची ही फार पूर्वीपासून पारंपारिक प्रथा आहे. यातून शेतकऱ्याचे अर्थचक्र चालत असे आज हे चक्र मोडकळीस आले असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. यास सरकार जबाबदार नाही का? ज्या शेतकऱ्यांच्या गोवंश व गोमाता पोलिसांनी किंवा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे याची एक ही नोंदवही महाराष्ट्रभर पोलीस स्टेशनला मिळू नये ही खेदाची बाब आहे. गोशाळेमध्ये गोवंश व गोमाता हस्तांतरित करताना तिची वैद्यकीय चाचणी घेतली जात नाही. असे गोवंश किंवा गोमाता स्वीकारल्याचे कुठलीही गोशाळा चार ओळी लिहून देत नाही. गोवंश किंवा गोमातेच्या वैद्यकीय नोंदवहया गोशाळेत सापडत नाहीत. गोशाळेतून गोवंश किंवा गोमाता हरवलेल्या मृत पावलेल्या नोंदी सापडत नाहीत. पण बोगस गोशाळेतून गोमाताची संख्या गोवंशाची संख्या प्रतिदिन कमी होत असल्याचे प्रत्यक्ष भेटीदरम्यान समजते व अनुभवता येते.
गोमाता किंवा गोवंश वाहतुकीस अडकाठी अडसर निर्माण करून व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून त्यांना हिसकावून घेऊन जाणाऱ्यांवर दरोडेचे गुन्हे खुणाचे गुन्हे जबरी मारहाणीचे गुन्हे दाखल झाले असल्याचे निदर्शनास येत नाही. जिवंत गोमाता किंवा गोवंश कत्तलखान्याकडेच नेले जाते का? हा प्रश्न पोलिसांना प्रशासनाला किंवा समाज सुधारकांना धर्म सुधारकांना केव्हा पडणार आहे? दाढी व टोपीवाला जनावरांचा व्यापारी असू शकत नाही का? पिढ्यांना पिढ्या जनावरांचा व्यापार करणारे हे दाढी टोपी वाले लोक कृषी उत्पन्न बाजार समितीतून आज नाहीसे का होऊ लागले आहेत शेतीच्या आर्थिक चक्राला चालना देणारे ही दाढी टोपीवाली लोकं आज या व्यवसायापासून फारकत घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही का?
महाराष्ट्र सरकार या वृद्ध आजारी निरुपयोगी भाकड जनावरांसाठी पशु निवारा केंद्र उभारणार आहे की नाही? या निरुपयोगी भाकड जनावरांचे योग्य ते मूल्य शेतकऱ्यांना देणार आहेत की नाही जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र गतिमान करता येईल शेतकऱ्यांची जनावरे व्यापाऱ्यांची जनावरे यांना वाहतूक परवानगी आहे. वैद्यकीय दाखले आहेत अशा जनावरांच्या वाहतूककीस संरक्षण देणार आहे की नाही? प्रत्येक वाहतूक होणारे जनावर हे कत्तलखान्यातच जाणार आहे असे गृहीत धरून निष्पाप लोकांना मारहाण करून आर्थिक लूट करणाऱ्या स्वयंघोषित स्वरक्षक व प्रशासक यांचा बंदोबस्त करणार आहे की नाही?
गोशाळा चालक-मालक व गोवंश व गोमातांचे कायदेशीर मूल्यमापन होणार आहे की नाही? खोटी कागदपत्र बनावट निवारा केंद्र दाखवून सरकारचे अनुदान लुटणाऱ्या बोगस लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत की नाही?
महाराष्ट्रातीलच विशिष्ट समाजाने जनावरांच्या खरेदी विक्री वाहतुकीवर बहिष्कार घातल्याने महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकरी मजूर यांवर आर्थिक संकट कोसळलेले आहे यासाठी सरकार सरकार सारखे काम करणार आहे की नाही?
भारतातील इतर राज्यांमध्ये असे त्रासदायक मुघली कायदे निर्माण केलेले नाहीत मग अशा कायद्याची महाराष्ट्राला गरज आहे की नाही? याबद्दल तज्ञ सल्लागार समितीची शिफारशी घेणार आहे की नाही? असे एक नाही असंख्य प्रश्न कुडाला मेडीचा आधार असणारे कंजाळात राहणारे छोटे शेतकरी आपणास विचारत आहेत. या तुगलुकी कायद्यामुळे आपल्या सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच स्वघोषित स्वरक्षक व प्रशासक आपल्या कायद्याला काळिंबा फासत आहेत. आपल्या सरकारची बदनामी करत आहेत. याची पुरेशी जाणीव आपल्या सरकारला व्हावी यासाठी हा शब्द प्रपंच..
आपला
अभिजित कांबळे