महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२४ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना किंवा दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन निश्चित करण्यात येते. त्यानुसार सर्व संबंधित संस्थांना प्रस्तावित वेळापत्रक पाठवून दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून ज्या परीक्षेबाबतचा सदर तपशील प्रसिद्ध करण्यात आला नसेल त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात किंवा अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.