गुटखा माफियांना अभय कोणाचे? बारामतीत अवैध गुटखा विक्रीचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
गुटखा माफियांना अभय कोणाचे? बारामतीत अवैध गुटखा विक्रीचा सुळसुळाट; अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
बारामती : शासनाने महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला गुटखा बारामतीत मात्र सहज उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात अवैध गुटख्याचा घाऊक पुरवठा सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असताना, मोठी आणि निर्णायक कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवाजी चौक परिसरातून काही व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत असून, या संदर्भात “वाडकर व मदने” यांच्या नावांची चर्चा स्थानिकांमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध गुटखा विक्रीबाबत तक्रारी, प्रसारमाध्यमांमधील बातम्या आणि नागरिकांच्या मागण्या होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून मोठ्या साखळीवर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत की, अवैध गुटखा व्यापारावर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे का, की तपास अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला नाही?
गुटखा विक्री ही केवळ बेकायदेशीर बाब नसून ती सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त विशेष मोहीम राबवून संपूर्ण पुरवठा साखळीचा शोध घ्यावा, साठे जप्त करावेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता बारामतीकरांच्या नजरा संबंधित यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत. या प्रकरणात वस्तुस्थिती काय आहे, हे निष्पक्ष तपासातून समोर येणे आवश्यक आहे, जेणेकरून निराधार आरोप दूर होतील किंवा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.


