पणदरेतील बँक ऑफ इंडिया एटीएम-सीडीएम फोडून तब्बल ₹14.19 लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
पणदरेतील बँक ऑफ इंडिया एटीएम-सीडीएम फोडून तब्बल ₹14.19 लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
बारामती, दि. ३० : बारामती तालुक्यातील पणदरे येथील बँक ऑफ इंडिया शाखेजवळील एटीएम व सीडीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातील तब्बल ₹14,19,100 रकमेची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तुषार लीलाधर पाटील, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, पणदरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जुलै रोजी सायंकाळी शाखा बंद केल्यानंतर एटीएम व सीडीएम मशीन सुरक्षित स्थितीत होती. मात्र २९ जुलै रोजी सकाळी बँकेच्या कर्मचाऱ्याने स्वच्छतेसाठी गेल्यानंतर मशीन फोडून त्यातील रोकड चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
तपासात सीडीएम मशीनमधून ₹2,26,400 तर एटीएम मशीनमधून ₹11,92,700 अशी एकूण ₹14,19,100 रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. तसेच दोन्ही मशीनचेही नुकसान करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत कलम 305, 324(4), 324(5) आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, माळेगाव पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.


